
देसाईगंज : रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी खोदकाम केलेल्या ठिकाणी दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना, ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ते कडेला उलटले. यात दबून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चोप-कोरेगाव मार्गावर शनिवार, २९ जून रोजी सकाळी १० वाजता घडली.
अविनाश शनिराम ठाकरे (३२) रा. चोप असे अपघातात ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर ते बोळधा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. चोप ते कोरेगावपर्यंत दीड किमी अंतराचे काम जानेवारी महिन्यात सुरू झाले, परंतु कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे काम रखडले होते. नागरिकांचा रेटा वाढल्यानंतर कंत्राटदाराने घाईगडबडीत कामाला सुरुवात केली. खोदलेल्या रस्त्यावर गिट्टीचे ढिगार केले; परंतु रस्ता बांधकाम सुरू असल्याचे फलक लावले नाही. दरम्यान, २९ जून रोजी सकाळी १० वाजता चोप येथील शुभम नागपूरकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने अविनाश ठाकरे हे तलावातील गाळ घेऊन जात असताना, समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना कडेलगतच्या गिट्टीच्या ढिगावरून ट्रॅक्टर उलटले. यात अविनाश हा ट्रॅक्टरखाली दबून जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच पीएसआय कोमल माने, बीट जमादार सरफे यांनी मोका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप, एपीआय आगरकर मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



