गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यात पहिला इंटरनेट बँकिंगचा परवाना

गडचिरोली : जिल्ह्याच्या अर्थकारणाची धमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला इंटरनेट व्यवहारासाठीचा परवाना मिळाला आहे. अशा पद्धतीने इंटरनेट परवाना मिळालेली ही राज्यातील एकमेव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या ४० व्या वर्धापनदिनी या मंजुरीचे पत्र प्राप्त झाले. त्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागातील ग्राहकांना २४ तास इंटरनेट बँकिंगची सेवा उपलब्ध राहणार आहे.
राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती बँका कार्यरत आहेत. जिल्ह्यात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५७ शाखा असून सुमारे ४ लाख ३५ हजार खातेदार आहेत. दुर्गम, अतिदुर्गम गावांसह ग्रामीण व शहरी भागात अत्याधुनिक डिजिटल सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, क्रेडिट कार्ड, ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड या सुविधांचा यात समावेश आहे. इंटरनेट बैंकिंगसाठी ८ महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेने प्रस्ताव सादर केला होता, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रचित अरविंद पोरेड्डीवार यांनी सांगितले.
बँकेची आर्थिक स्थिती सक्षम हवी, सलग पाच वर्षे बँक नफ्यात असावी. एनपीएचे प्रमाण मर्यादित, नाबार्डकडे बँकेची ‘अ’ श्रेणीत नोंद हवी, असे निकष पाहून इंटरनेट बैंकिंगसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना दिला जातो. हे सर्व निकष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पूर्ण केले.



