अज्ञाताने पेट्रोल टाकून जाळले साडेचार एकरातील धान

दोन शेतकऱ्यांचे दोन लाखांचे नुकसान ; चौकशी करून कारवाईची मागणी
कुरखेडा : कापणी व बांधणीनंतर धान पिकाचे पुंजणे शेतात करून ठेवले; परंतु याच पुंजण्यांवर कुप्रवृत्तीची वक्रदृष्टी पडली. मळणीच्या प्रतीक्षेत असलेले दोन शेतकऱ्यांचे साडेचार एकरातील धान पुंजणे अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून जाळले. ही घटना कुरखेडा तालुक्याच्या मौशी येथे बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.
मौशी येथील शेतकरी तथा पोलिस पाटील टिकाराम सहारे यांची दीड एकर शेती मौशी-कुरखेडा महामार्गाला लागून आहे. याच परिसरात आनंदा माधव बोदेले यांची तीन एकर शेती आहे. टिकाराम सहारे यांच्या शेतात धानाचे दोन पुंजणे होते तर बोदेले यांच्याही शेतात एक धानाचा पुंजणा होता. थ्रेशर मशीन उपलब्ध होताच मळणीचा बेत शेतकऱ्यांचा होता. दरम्यान, बुधवारच्या रात्री ११ वाजता शेतात आगीचे लोळ उठत असल्याचे मौशीवासीयांना दिसले. त्यांनी वेळीच शेताकडे धाव घेतली, तर पुंजणे आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसून आले. त्यानंतर वेळीच कुरखेडा येथील नगर पंचायतचे अग्निशमन वाहन बोलावण्यात आले. रात्री १२ वाजेच्या सुमारास अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत पुंजणे जळून खाक झाले होते. दुसऱ्या दिवशी शेतकरी सहारे व बोदेले यांनी कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली. या तक्रारीवरून आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. वर्षभरातील श्रमाची क्षणात राख झाल्याने मोठे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.
पुंजणे जळालेल्या परिसरात पाहणी केली असता गुरुवारी सकाळी पेट्रोलची रिकामी बॉटल आढळली. त्यामुळे आरोपीने पेट्रोल पंपावरून बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन त्याचा वापर धानाचे पुंजणे जाळण्यासाठी केला असावा, अशी शंका पोलिसांना आहे. पंपावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती बरेच धागेदोरे लागू शकतात.



