
माजी खा. डॉ. अशोक नेते यांचे मार्गदर्शन
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्ह्याची जिल्हा पदाधिकारी बैठक गडचिरोली येथे पार पडली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि पुढील कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला विधानसभा, तालुका मंडळ आणि जिल्हा परिषद सर्कल स्तरावर कामाची जबाबदारी सोपवण्याचे आवाहन केले. पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करून संघटना अधिक मजबूत करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला भाजप जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, सदानंद कुथे, तसेच जिल्हा आणि मंडल पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे आगामी काळात भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी जिल्ह्यात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.



