
चंद्रपूर आणि गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग आणि झाडीबोली साहित्यदालन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे झाडीबोली नाट्यसंमेलन १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. झाडीपट्टीतील परंपरागत लोककला, भाषा, संस्कृती आणि सामाजिक समस्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हे संमेलन होत असून, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संमेलनाला कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगांवकर, झाडीबोली साहित्यीक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, पद्मश्री डॉ. परशूराम खुणे, नाट्यकलावंत डॉ. श्याम मोहरकर, वरीष्ठ प्राध्यापक डॉ. सदानंद बोरकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. श्याम खंडारे, डॉ. निळकंठ नरवाडे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या नाट्यसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तीन प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे: झाडीबोली एकांकिका स्पर्धा: विजेत्यांना ₹६,००० (प्रथम) आणि ₹३,००० (द्वितीय) रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. एकपात्री अभिनय/नाट्यछटा स्पर्धा: प्रथम विजेत्याला ₹२,००० आणि द्वितीय विजेत्याला ₹१,००० रोख बक्षीस मिळेल. झाडीबोली लोककला स्पर्धा: यामध्ये ₹२,००० (प्रथम) आणि ₹१,००० (द्वितीय) अशी रोख बक्षिसे असतील. यामध्ये दंडार, खडीगंमत, डाहका, झडत्या, महादेवाची गाणी, पांगुळ, आदिवासी नृत्य अशा लोककलांचा समावेश आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२५, सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे. स्पर्धेतील सादरीकरण फक्त झाडीबोली मराठी भाषेतच असावे. तसेच, सादरीकरणात कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा राजकीय व्यक्तीचा उल्लेख करू नये. स्पर्धेचे प्रवेश अर्ज आणि नियमांची सविस्तर माहिती घेण्यासाठी नाट्यसंमेलन समन्वयक डॉ. नीलकंठ नरवाडे यांच्याशी ९५०३०८१७९० या क्रमांकावर संपर्क साधावा.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन झाडीबोली संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



