गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

देसाईगंजचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार!

आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजना प्रकल्पाचे भूमिपूजन 

देसाईगंज : स्थानिक देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत देसाईगंज शहर पाणी पुरवठा योजना प्रकल्पाचे भूमीपुजन आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते स्थानिक नगर परिषद कन्या शाळा, शिवाजी वार्ड येथे पार पडले.

याप्रसंगी बोलताना आमदार गजबे म्हणाले की, सदर योजना मंजूर करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु प्रयत्नाअंती आपण सदर योजना मंजूर करण्यास यशस्वी झालो. कारण वेळोवेळी आपले नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचारी तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी यांनी वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे व माहिती पुरवून सहकार्य केल्यामुळे ही योजना मंजूर होऊ शकली.

याप्रसंगी बोलताना प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके म्हणाले की, देसाईगंज नगर परिषदेची जुनी पाणी पुरवठा योजना फार जूनी असल्याने, शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अपूरी पडत आहे व देसाईगंज शहराला शुध्द पाण्याचा मुबलक पुरवठा होण्यास अडचण निर्माण झाली आहे, यामूळे या नविन प्रकल्पाअंतर्गत देसाईगंज नगर परिषदेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन राज्य शासनाकडे सादर केले होते. त्यानुसार शासनाने रुपये 64 कोटी 84 लाख 79 हजार 517 रुपये किंमतीची पाणीपूरवठा योजना मंजुर केलेली आहे. ज्यामध्ये शहराच्या विविध भागांमध्ये 4 ठिकाणी नविन पाणी टाकी उभारण्यात येणार आहेत तसेच संपुर्ण शहरात एकुण १२७ कि.मी. नविन पाईपलाईन टाकण्यात येणार असून, वैनगंगा नदीवर नविन जॅकवेल पंप हाऊस, जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे सन 2055 पर्यंत देसाईगंज शहरवासीयांना मुबलक प्रमाणात व शुध्द पाणी पुरवठा होणार आहे. सदर प्रकल्प मंजुरी करिता आमदार गजबे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्यांचे नगरपालिकेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांनी आभार मानले.

या कार्यक्रमांस माजी नगराध्यक्ष किशन नागदेवे, शालू दंडवते, माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, कोरची नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे, माजी नगर सेवक सचिन खरकाटे, राजेश जेठाणी, नरेश विठ्ठलानी, माजी नगरसेविका आशा राऊत, हेमा कावळे, माजी महिला व बालकल्याण सभापती जि.प. रोशनी पारधी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख अंबाजी आमनार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता कार्यालय अधिक्षक प्रमोद येरणे, लेखापाल अविनाश राठोड, पाणीपूरवठा अभियंता आशिष गेडाम व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास शहरातील नागरीक बहूसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button