गडचिरोलीत पूरस्थिती ; भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला, तरुण नाल्याच्या पुरात वाहून गेला

जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद
गडचिरोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. १८ ऑगस्टच्या रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला असून, पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आलापल्ली-भामरागड (१३०-डी) या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
या पूरस्थितीदरम्यान भामरागड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा हा तरुण खंडी नाला ओलांडत असताना नाल्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. प्रशासनातर्फे त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी दिली आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पुराच्या पाण्यातून रस्ते ओलांडण्याचा धोका पत्करू नये असे आवाहन केले आहे.
वाहतुकीस बंद असलेले प्रमुख मार्ग
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग-१३० डी (पर्लकोटा नदी), अहेरी-वटरा रस्ता (वटरा नाला), तळोधी-आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-381(पोहार नदी), कुरखेडा-वैरागड रस्ता राज्यमार्ग-377 (सती नदी), चौडमपल्ली-चपराळा रस्ता प्रजिमा-53 स्थानिक नाला), काढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-7(स्थानिक नाला), शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता प्रजिमा-1, कोकडी ते तुलशी रस्ता प्रजिमा -49, कोपेला-झिंगानूर रस्ता प्रजिमा-26 (स्थानिक नाला), कोंढाळा-कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-47, पोर्ला-वडधा रस्ता प्रजिमा-7 हे ११ मार्ग बंद आहेत.



