
गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी (दि.१५) आरमोरी येथे अमृत योजना २.० अंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. यावेळी बोलताना त्यांनी पाणीपुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावे, तसेच पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते त्वरित पूर्ववत करण्यात यावेत, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
या कार्यक्रमाला खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, तहसीलदार उषा चौधरी, अशोक नेते, कृष्णा गजबे, महेंद्र ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते.
ॲड. जयस्वाल यांनी सांगितले की, ५७ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेतून ९१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून आरमोरी शहरातील प्रत्येक घरात शुद्ध नळपाणी पोहोचवले जाईल, ज्यामुळे प्रत्येक कुटुंबाला थेट लाभ मिळेल.
वेगवान प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे :
सामान्य माणसाच्या अडचणी सोडवून आरमोरीसह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने साधायचा असेल, तर सर्व जनप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केले पाहिजे, असे मत ॲड. आशिष जयस्वाल यांनी मांडले.
यावेळी त्यांनी “धावणारे पाणी हळू चालवायला, चालणारे पाणी थांबवायला आणि थांबलेले पाणी जिरवायला शिका” असा पाणी वाचविण्याचा संदेशही दिला.
खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, अशोक नेते, कृष्णा गजबे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी प्रास्ताविकातून अमृत पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमाला नगरपरिषद आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



