क्राईमगोंदियाविदर्भ

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने स्वतःला पेटविले

पांजरा गोविंद येथील घटना ; आरोपी प्रियकरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

गोंदिया : कोंढाळी येथील पोलीस ठाण्यांतर्गत पांजरा गोविंद येथे प्रेम प्रकरणातून अल्पवयीन तरुणीने टारपीन स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१७ डिसेंबर) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

मृतक अल्पवयीनचे नाव कशिश विठ्ठल येडमे (१६, रा. पांजरा गोविंद, ता. नागपूर ग्रामीण), असे आहे. मृतक ही नागपूर अमरावती मार्गावरील आठवा मैल येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीत वाणिज्य शाखेत शिकत होती. कशिशचे साहिल नागोराव कुडमते (२४, रा. खडगाव वाडी) याच्याशी प्रेमसंबंध होते. तो नात्यातील आहे. तरुणीच्या मोबाइलमधील काही फोटोवरून तिच्या प्रेमसंबंधाची माहिती आतेभाऊ आकाश टेकाम याला मिळाली. तरुणीचा भाऊ हा इयत्ता १२ वीत असून विज्ञान शाखेत लाखोटिया भुतडा महाविद्यालय, कोंढाळी येथे शिकतो. तो काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने आतेभाऊ आकाश हा मामाच्या घरी झोपायला आला होता, तेव्हा कशिशच्या प्रेमसंबंधाची माहिती आईवडिलांना मिळाली. कुटुंबीयांनी कशिशची समजूत घातली; परंतु ती साहिलसोबत लग्न करण्यास तयार होती.

दरम्यान, कुटुंबीयांना घरून पळून जाण्याची व आत्महत्येचीसुद्धा धमकी दिली होती. मृतकाचे वडील विठ्ठल येडमे, आई लता येडमे व भाऊ वैभवने कशिशला घेऊन कोंढाळी पोलीस ठाण्यात १६ डिसेंबरच्या सायंकाळी आले. पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी तरुणीची समजूत घातली; पण ती साहिलसोबत लग्न करण्यावर ठाम होती. यावेळी साहिलला मोबाइलवर कॉल केला असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. कोंढाळी पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन सर्वांना घरी पाठविले. १७ डिसेंबरला ११ वाजता पुन्हा कोंढाळी पोलिसांनी ठाण्यात बोलाविले. कशिशचे आई-वडील व भाऊ मंगळवारी (१७ डिसेंबर) सकाळी ११ वाजता ठाण्यात आले. घरी कशिश व त्यांची घराशेजारील मामी अनिता रवींद्र टेकाम सोबत होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास कशिशने मामीला घरी परत पाठविले. घराचे दार आतून बंद करून अंगावर ऑइल पेंटमध्ये मिक्स करण्यात येणारे टारपीन अंगावर टाकून स्वतःला पेटून घेतले. घरातून धूर निघताना बघून लोकांनी घरामागील दरवाजा तोडून कशिशला विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तिचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती पांजरा गोविंद येथील पोलीस पाटील प्रदीप खोडे यांना मिळाली. ठाणेदार राजकुमार त्रिपाठी, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम व ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. मृतकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. कोंढाळी पोलिसांनी आरोपी साहिल कुडमतेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. कोंढाळी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार राजकुमार त्रिपाठी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button