गोंदियाविदर्भ

प्रतापगडच्या शिव मंदिरात ‘सिकलसेल’ तपासणी शिबीर ; दुर्गम भागातील नागरिकांना ‘अरुणोदय’ अभियानाचा लाभ

‘सिकलसेल कुंडली’ जुळवणे हीच बचावाची गुरुकिल्ली; अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोग्य पथकाचा विशेष पुढाकार

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियाना’ने आता जिल्ह्यातील दुर्गम भागातही गती घेतली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रतापगड येथील शिव मंदिरात नुकतेच सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबीर उत्साहात संपन्न झाले.

दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांना सिकलसेलसारख्या गंभीर आजाराची वेळेवर माहिती मिळावी, या उद्देशाने ३० जानेवारी रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिव मंदिराच्या पवित्र परिसरात सिकलसेल ‘सोल्युबिलीटी’ रक्त तपासणी करून बाधितांना जागेवरच समुपदेशन करण्यात आले.

आरोग्य पथकाने ग्रामस्थांना सिकलसेल हा अनुवांशिक आजार कसा आहे, हे समजावून सांगितले. रक्ताच्या नात्यातील लग्न टाळणे आणि विवाहापूर्वी मुला-मुलीची ‘सिकलसेल कुंडली’ (रक्त तपासणी अहवाल) जुळवणे, हीच या आजाराला रोखण्याची गुरुकिल्ली आहे. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या २२ दिवसांच्या मोहिमेत ० ते ४० वयोगटातील प्रत्येक नागरिकाने आपली मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेवक सैय्यद यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्य सेविका कोमल पडोळे, अर्चना मेंढे आणि महालॅबच्या फ्लेबोटोमिस्ट नेहा कापगते यांनी रक्त तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली. आशा स्वयंसेविका पौर्णिमा वालदे यांनी दुर्गम वस्त्यांमधील नागरिकांना शिबिरापर्यंत आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

या प्रसंगी प्रतापगडचे सरपंच भोजराम लोगडे, उपसरपंच उमेष मडावी, ग्रामपंचायत सदस्य रेवता गहाणे यांनी स्वतः उपस्थित राहून ग्रामस्थांना तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रामसेवक नरेंद्र गोमासे, मनोज डोंगरवार, आरोग्य सहाय्यक सुरेश पारधी आणि अंगणवाडी सेविकांचीही प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button