
शहर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना निर्देश दिले होते. त्यानुसार शहर पोलिसांनी आचारसंहिता काळात अवैध दारूच्या ११०, एनडीपीएसच्या चार, सुंगधित तंबाखूच्या दोन कारवाया करून तब्बल २३ लाख पाच हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या. या कारवाईने जिल्ह्यातील गुन्हेगार भुईसपाट झाल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली, तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचा सपाटा सुरू केला. १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत अवैध दारूच्या ११० कारवाया करून ११ लाख ५९ हजार २४० रुपयांच्या दारूसह ११ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर एनडीपीएसच्या चार कारावाया करून दोन लाख १२ हजार ६० रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच ५७ हजार ४०५ रुपयांची सुंगधित तंबाखू जप्त केला. या सर्व कारवाया पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शहर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात एपीआय नीलेश वाघमारे, पीएसआय संदीप बच्छिरे, विष्णू नागरगोजे, देसरकर, कपूरचंद आदींनी केली.
आचारसंहिता लागताच शहर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली होती. त्यानुसार पितळी बुलेट, पाच जिवंत काडतूस, लोखंडी देशी कट, दोन तलवार, फायटार, चाकू मोसा, कोयता अशा एकूण आर्म ऍक्टच्या नऊ कारवाया करत ८० हजार ६२० रुपयांचे साहित्य जप्त केले.
निवडणुकीत कोणतीही बेकायदेशीर गोष्ट घडू नये, मतदानादरम्यान आपापसांत भांडण लावून देणे, हाणामारी करणे, प्रक्षोपक भाषण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवणे यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या १०० सराईत गुन्हेगारांना निवडणुकीचा अधिकार अबाधित ठेवून तीन दिवसांसाठी स्थानबद्ध केले होते. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई होती.



