जादूटोण्याच्या संशयातून वृद्धेची गळा चिरून हत्या

ग्लासफोर्डपेठा येथील घटना ; आरोपी फरार
सिरोंचा : जादूटोण्याच्या संशयातून एका इसमाने चाकूने गळा चिरून वृद्धेची हत्या केली. ही घटना सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी गावापासून १ कुम्मरी किमी अंतरावर घडली.
रुकमा बकय्या दुर्गम (६४) असे मृत वृद्धेचे नाव आहे, तर बापू किष्टय्या कुम्मरी (३८) असे आरोपीचे नाव आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीवर अन्य एका महिलेसोबत रुकमा दुर्गम या कपडे धुवायला जात होत्या. याबाबत माहीत होताच बापू कुम्मरी हा त्यांच्या मागावर गेला. त्याने गावापासून १ किमी अंतरावरच दोन्ही महिलांना गाठले. दुसऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून परतवून लावत गावात कोणालाही काही सांगायचे नाही, अशी तंबी दिली. त्यानंतर रुकमाबाई दुर्गम यांना आडवे पाडून त्यांच्यात गळ्यावर चाकूने वार केला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने रुकमाबाई जागीच गतप्राण झाल्या. त्यानंतर आरोपी फरार झाला. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या भांडण झालेले होते. अधिक तपास बामणी उपपोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद कुरसुंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दांडे करीत आहेत.



