
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून नजीक असलेल्या खरपुंडी येथील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलीस आणि मुक्तिपथ तालुका टीमने संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईत एका घरातून २० लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली असून, संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरपुंडी गावात दारूविक्री सुरू असल्याने गावातील आणि आजूबाजूच्या गावातील व्यसनी लोक दारू पिण्यासाठी येथे येत असतात. यामुळे गावात भांडण, तंटे निर्माण होऊन गावातील महिलांना अधिक त्रास होतो. तसेच, कमी वयाच्या मुलांनाही व्यसन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी गाव दारूविक्रीमुक्त होते, ते पुन्हा तसेच झाले पाहिजे, यासाठी गावसंघटनेने कंबर कसली आहे.
गावसंघटनेकडून गावातील दारू विक्रीबाबत तक्रार प्राप्त होताच, गडचिरोली पोलीस आणि मुक्तिपथ तालुका टीमने संयुक्त मोहीम राबवली. दरम्यान, एका महिलेकडे २० लिटर मोहफुलाची दारू मिळून आली. याप्रकरणी संबंधित महिलेवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी भुसारी, कोसरे, आगासे यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक रेवनाथ मेश्राम, मेघा गोवर्धन आणि पल्लवी पेटकर उपस्थित होते. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रीवर काही प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा असून, गावकऱ्यांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.



