भंडाराविदर्भ

पालकमंत्र्यांच्या हस्ते अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन

भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सिकलसेल आजाराचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत असून, त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागामार्फत भंडारा जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते फीत कापून, दीपप्रज्वलन व माहिती पुस्तिकेचे अनावरण करून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी सावनकुमार, पोलीस अधीक्षक नुरुन हसन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल टेभूर्णे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अजिंक्य आंबाडकर, कार्यक्रम समन्वयक रोहिणी पवार आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सिकलसेल ॲनिमिया हा पिढ्यानपिढ्या काही समुदायांमध्ये आढळणारा गंभीर आजार असून, त्याचे प्रमाण विशेषतः विदर्भात अधिक आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी व भविष्यात समूळ उच्चाटनासाठी जनजागृती आणि तपासणी अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच नागरिकांनी स्वतःसह कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी, आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सिकलसेल रुग्ण व वाहकांना सिकलसेल कार्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. श्रीकांत आंबेकर (साथरोग शास्त्रज्ञ) यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button