
७ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत ; चौकशीत अनेक गैरकारभाराचे प्रकार उघड
गडचिरोली : तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांनी केलेला गैरव्यवहार सिद्ध झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी त्यांना निलंबित केले आहे. गेल्या ७ वर्षांपासून दिलीप मेश्राम हे एकाच ठिकाणी कार्यरत होते.
ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांच्या चौकशीत अनेक गंभीर गैरकारभाराचे प्रकार समोर आले आहेत, ज्यात निकृष्ट दर्जाची कामे करणे. विना टी.पी.ची अवैध रेती उचल करणे. ई-टेंडर न करताच साहित्याची खरेदी करणे. अंदाजपत्रकाशिवाय कामे करणे. ऑनलाईन आराखड्यात मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च करणे. कोटेशन ग्रामपंचायतीच्या सभेत मंजूर न करणे. बांधकाम कामाकरिता मंजुरी न घेणे. घरटॅक्स वसुली केलेली रक्कम बँकेत जमा न करता अफरातफर करणे. खरेदी रकमेच्या बिलातून २ टक्के जीएसटी न भरणे. स्वतःच्या मुलाच्या नावाने ई-टेंडर भरणे.
या सर्व गैरकारभाराच्या बाबी चौकशीत लक्षात आल्यानंतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी सदर प्रकरण गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे माहिती आणि पुढील कारवाईसाठी सादर केले. या चौकशीच्या आधारेच ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना निलंबित करण्यात आले आहे.
राजकीय दबावामुळे कारवाईस विलंब?
या गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार सन २०२१ मध्येच करण्यात आली होती, परंतु ग्रामसेवक मेश्राम यांनी आपल्या राजकीय बळाचा वापर करून चौकशी प्रक्रिया बाधित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पंचायत समितीच्या गोटातून कळते. मात्र, आता गैरव्यवहार सिद्ध झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.



