बीडीसीसी बँकेत दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक

४ डिसेंबरच्या रात्री घडली होती घटना
लाखांदूर : मागील पंधरवड्यापूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बीडीसीसी बँकेच्या समोरील दाराचे कुलूप तोडून तिजोरीतून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिजोरी न तुटल्याने सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर व मॉनिटर घेऊन गेले होते. त्यांच्या शोधात असलेल्या पोलिसांना अखेर १९ दिवसांनंतर यश आले असून चार जणांना अटक केली आहे.
दरोड्याची ही घटना ४ डिसेंबरच्या रात्री तालुक्यातील डोकेसरांडी येथील बीडीसीसी बँकेत घडली होती. या घटनेतील सहभागी आरोपींचा तपास पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान २३ डिसेंबरच्या रात्री चौघांना अटक केली. यात नागपूर येथील खाडीकपुरा पारडी येथील गोलू शेखर लारोकर (१९) मध्य प्रदेशातील पांढुरना जिल्ह्यातील बडचिचोली येथील पूर्वेश दिलीप खवसे (१९), सार्थक मनोहर नेवारे (२२) व नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील यशोधरा नगरीतील असलम अब्दुल शरीफ खान (२१) या चार आरोपींचा समावेश आहे.
४ डिसेंबरच्या सायंकाळी नियमित वेळेनुसार कर्मचारी बँक कुलूपबंद करून घरी गेले होते. तर बँक व एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी बँक परिसरात एटीएममध्ये कार्यरत होता. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचा वीजपुरवठा बंद करून समोरील कुलूप तोडून प्रवेश केला होता.
दरम्यान आरोपींचा येथील बँकेत दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केली होती. चोरी करून पसार होत असलेले आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याने उमरेड पोलिसांनी अटक केली होती. चौकशीदरम्यान त्यांनी डोकेसरांडी येथील बँकेत दरोड्याचा प्रयत्न केला होता, अशी कबुली दिली. त्या आधारावर ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेतील आरोपींना तपासासाठी ताब्यात घेऊन अटक केली.



