
गागठाणा-धोप राष्ट्रीय महामार्गावरील घटना
तुमसर : तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नागठाणा-सालई शेतशिवारात २६ डिसेंबर रोजी सकाळ दरम्यान अज्ञात वाहनाने नर जातीच्या काळवीटाला धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील खापा-रामटेक राष्ट्रीय मार्गावर नागठाणा-सालई शिवारात अन्नपाण्याच्या शोधात हरीण आणि काळवीट यांच्यासह अन्य वन्यप्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेकदा प्राण्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी हरीण ठार झाल्याची घटना घडली होती. परंतू वनविभागाच्या कडक कायद्याच्या धाकात सुध्दा वाहनचालक मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अजिबात करीत नसल्याचे उदाहरण समोर येत आहेत. त्यात उपचाराअभावी अनेक वन्यप्राण्यांच्या जीव गेल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यास मिळाली आहे. दरम्यान २६ डिसेबर रोजी सकाळच्या दरम्यान चारा पाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडत गावाकडे मार्गक्रमण करणाऱ्या एका नर जातीच्या काळवीटला अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडताना जबर धडक दिली. त्यात काळवीट गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. सदर घटनेची माहिती तुमसर व कांद्री वनपरिक्षेत्र क्षेत्र कार्यालयाला देण्यात आली.
दरम्यान दोन्ही वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचली. भटक्या व हिंस्र श्वानापासून अथवा वाहनांपासून मृत काळवीटाला धोका पुन्हा पोहचू नये म्हणून येणाऱ्या-जाणाऱ्या वन्यप्रेमींनी काळविटाला राष्ट्रीय महामार्गावरुन बाजूला करून घटनास्थळी वन्यप्रेमी तळ ठोकून होते, अशी माहिती आहे. मृत काळविटावर वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.



