क्राईमनागपूरविदर्भ

उसने पैसे न दिल्याने मित्राचा दगडाने ठेचून खून 

तुरुंगातून सुटल्यानंतर दोन महिन्यातच केला खून

नागपूर : उसने पैसे न दिल्यामुळे अट्टल गुन्हेगाराने दारूच्या नशेत बालपणीच्या मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाबूलखेडाजवळ अविनाश ग्राउंडमध्ये गुरुवारी २६ डिसेंबरला सायंकाळी ६:३० ते २७ डिसेंबरला रात्री १२:३० वाजेदरम्यान घडली असून, अजनी पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

कुलदीप रंजन चव्हाण (३६, रा. बेसा पॉवर हाउसमागे, न्यू म्हाळगीनगर), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुलदीप मजुरी करीत होता, तर रिचेश दीपक शिक्कलवार (३४, रा. साईनगर, म्हाळगीनगर, हुडकेश्वर), असे खून करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी रिचेश आणि मृतक कुलदीप हे एकाच परिसरात राहत असून, दोघेही बालपणीचे मित्र होते. आरोपी रिचेश हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने नंदनवनमध्ये राहुल तुर्के नावाच्या व्यक्तीचा खून केल्यामुळे तो तुरुंगात होता. दोन महिन्यांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला. आरोपी रिचेश आणि मृतक कुलदीप दोघांनाही दारूचे व्यसन होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रिचेशने तीन दिवसांपूर्वी कुलदीपला उसने पैसे मागितले; परंतु माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगून कुलदीपने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी दोघांनीही हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू घेतली. त्यानंतर रिचेशने कुलदीपला दुचाकीवर बसवून रात्री अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अविनाश ग्राउंडमध्ये आले. तेथे पुन्हा त्या दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. आरोपी रिचेशने दगडाने कुलदीपच्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले.

याप्रकरणी कुलदीपची पत्नी श्रद्धा कुलदीप चव्हाण (३२, रा. बेसा पॉवर हाउसमागे, न्यू म्हाळगीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी ठाण्याचे उपनिरीक्षक अल्लुरे यांनी आरोपी रिचेशविरुद्ध कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अजनी पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button