
२९ जुलै अंतिम तारीख, १३ डिसेंबर रोजी प्रवेश परीक्षा
भंडारा : नवोदय विद्यालय समितीने जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी सूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी निवड चाचणीद्वारे सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी २९ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, पाचगावचे प्रभारी प्राचार्य अजय अग्निहोत्री यांनी केले आहे. प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
राज्यातील नवोदय विद्यालयांमध्ये फक्त सहावीच्या वर्गात प्रवेश घेता येतो. यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीमध्ये शिकत असतानाच ही निवड चाचणी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमे प्रवेश दिले जातात. १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने ‘नवोदय विद्यालय समिती’ ही स्वायत्त यंत्रणा स्थापन केलेली आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आली आहेत. या विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाचा अभ्यासक्रम असतो.
भंडारा जिल्ह्यात पाचगाव, वरठी, मोहाडी येथे जवाहर नवोदय विद्यालय आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय असून, प्रत्येक विद्यालयात ८० जागा असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण जागांपैकी किमान ७५ टक्के जागा राखीव असतात. मुलींसाठी एकूण जागांपैकी किमान एक तृतीयांश जागा आरक्षित आहेत. इतर मागासवर्गीय (OBC) २७% जागा. दिव्यांग सरकारी नियमानुसार आरक्षण. अनुसूचित जाती (SC) किमान १५% जागा. अनुसूचित जमातीसाठी (ST) किमान ७.५% जागा राखीव असतात.
जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर https://cbseitems.rcil.gov.nvs जाऊन ‘ऍडमिशन प्रवेश’ हा पर्याय निवडून ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन प्राचार्य अजय अग्निहोत्री यांनी केले आहे.
निवड चाचणीसाठी पात्रता निकष
इच्छुक विद्यार्थी ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितो, त्या जिल्ह्यातील प्रमाणित रहिवासी असावा. ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे, त्या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी शाळेत संपूर्ण शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता पाचवी शिकत असावा. इच्छुक विद्यार्थी तिसरी, चौथी आणि पाचवी सलग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म १ मे २०१४ पूर्वी आणि ३० एप्रिल २०१७ नंतर झालेला नसावा. ग्रामीण भागाच्या आरक्षित कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची तिसरी, चौथी व पाचवी ग्रामीण शाळेतून पूर्ण झालेली असावी. जर विद्यार्थी तिसरी, चौथी किंवा पाचवीपैकी किमान एक दिवस जरी शहरी शाळेतून शिक्षण घेतलेला असेल, तर तो अर्ज शहर भागातून समजला जाईल. तृतीयपंथी उमेदवारांसाठी स्वतंत्र आरक्षण उपलब्ध नाही.



