गडचिरोलीविदर्भ

भरधाव कारच्या धडकेत एक ठार, तिघे जखमी

गोविंदपूरजवळील घटना

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला. गोविंदपूर गावाजवळ एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

चामोर्शीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या एका शेवरलेट कंपनीच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या धक्क्याने एक दुचाकीस्वार दुचाकीसह थेट शेतात फेकला गेला.

या अपघातात गोविंदपूर येथील विजय सुखदेव सातपुते (वय ४८) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी लता विजय सातपुते (वय ४०), सुधाकर रमेश दुधबळे (वय २४, रा. नवेगाव रै.) आणि देवेंद्र भांडेकर (वय ४२, रा. नवेगाव रै.) हे गंभीर जखमी झाले आहेत. देवेंद्र भांडेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, हाड मोडले आहे.

निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या कारचालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button