
धानोरा येथील बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
धानोरा : धानोरा तहसील कार्यालयात दारू व तंबाखू नियंत्रण संदर्भात गडचिरोली जिल्हा विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अवैध दारू विक्री आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीमध्ये शहर आणि ग्रामीण दोन्ही भागातील अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने ठोस रणनीती आखून कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश तहसीलदार गणेश माळी यांनी दिले. शासकीय/निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कोटपा (COTPA) कायद्यानुसार अधिकारी, मुख्याध्यापक व व्यवस्थापकांनी कारवाई करावी. शाळांनी तंबाखूमुक्त शाळा निकषानुसार काम करून शाळा तंबाखूमुक्त ठेवाव्यात. मुक्तिपथ गावसंघटन महिलांनी दारू संदर्भात अहिंसक कृती केल्यास पोलीस विभागाने तात्काळ दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करावा. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत समितीची बैठक घ्यावी व कार्यवाही करावी. यासाठी गट विकास अधिकारी (BDO) यांनी ग्रामपंचायतला पत्र पाठवावे. आरोग्य विभागाने एएनएम (ANM) आणि आशा वर्कर यांच्यामार्फत किशोरवयीन मुली, स्तनदा माता आणि गरोदर माता यांच्या बैठकांमध्ये खर्रा आणि तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम व्हीनायल शीटच्या माध्यमातून समजावून सांगावेत, असे निर्देश देण्यात आले.
यासोबतच, पोलीस विभागाने गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी गावातील पोलीस पाटील यांची मुक्तिपथ चमू सोबत कार्यशाळा आयोजित करावी, यावरही चर्चा झाली. बैठकीला पोलीस उपनिरीक्षक सुमित चेवले, आरोग्य विभागाचे ए.बी. कोडाप, नगरपंचायत अधीक्षक विना सहारे, लिपिक गुलाब ठाकरे, पोलिस हवालदार संतोष मलगाम, शुभम वैरागडे, अमोल मेश्राम, विवेक देवरे, गणेश तुळकर, रोशन निकोडे, मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर, उपसंघटक भास्कर कडयामी, ऊषा गावडे, मयुरी चिचघरे उपस्थित होते.



