10 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता, शिपायासह तिघांना अटक

एसीबीची कारवाई
गोंदिया : घरकुलाच्या लाभाची रक्कम खात्यात टाकण्यासाठी १० हजार रूपयांची लाच मागून खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारणाऱ्या कंत्राटी गृहनिर्माण अभियंता, ग्रामपंचायत कार्यालयातील चपराशी तसेच खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील ग्राम कामठा येथे बुधवारी (दि.१) ही कारवाई करण्यात आली. पंचायत समितीमधील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद बीरसिंग उपवंशी (३८), कामठा ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई धनंजय मुन्नालाल तांडेकर (४५) व खासगी व्यक्ती विश्वनाथ गोविंदराव तरोणे (६२, रा. कामठा) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार ग्राम कामठा येथील रहिवासी शेतमजूर असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. २७ नोव्हेंबरला कंत्राटी अभियंता उपवंशी व शिपाई तांडेकर यांनी तक्रारदाराच्या घरी येऊन घराच्या बांधकामाचे फोटो काढले.
तसेच तक्रारदाराच्या मुलास घरकुलाच्या अनुदानाचे १५ हजार रुपये वर्ग केल्याबाबत व घरकुलाच्या अनुदानाची उर्वरित रक्कम वर्ग करणार असून त्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची मागणी केली होती. २१ डिसेंबरला आरोपी उपवंशी याने तक्रारदाराला फोन करून अनुदानाच्या दुसरा हप्त्याचे ७० हजार त्यांच्या खात्यात वर्ग केल्याचे सांगून १० हजार रूपये तांडेकर याला देण्यास सांगितले होते. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणीदरम्यान आरोपी उपवंशी याने १० हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली तसेच अभियंता उपवंशी व शिपाई तांडेकर यांच्या सांगण्यावरून आरोपी तरोणे याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलिस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, महिला नायक शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.



