जिल्ह्यातील ४० शाळा झाल्या तंबाखूमुक्त

सन २०२४ मधील आकडेवारी
गोंदिया : जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून सन २०२४ मध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ४० शाळा तंबाखूमुक्त झाल्याची माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड यांनी दिली.
तंबाखू सारख्या व्यसनाने समाजाला ग्रासले असून तंबाखुमुळे कर्करोग व इतर गंभीर आजार बळवतात. त्यामुळे देशाची भावी पिढी या व्यसनांपासून दूर राहावी म्हणून शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांची जागृती करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून शाळा व शाळा परिसर हा तंबाखू मुक्त शाळा म्हणून ओळखला जावा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहे.
तसेच ज्या शाळा तंबाखू मुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील अशा शाळा या तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात येतात. सन २०२४ मध्ये जिल्ह्यातील ४० शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून यामध्ये सर्वाधिक शाळा गोंदिया तालुक्यातील आहेत. गोंदिया तालुक्यातील २३, तिरोडा तालुक्यातील चार, गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रत्येकी तीन, आमगाव तालुक्यातील दोन तर सालेकसा व देवरी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण ४० शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत.
शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी, समन्वयक, कर्मचारी, शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी सांगीतले. तसेच सन २०२४ मध्ये ४० शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून आणखी शाळा देखील लवकरच तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी सांगीतले.
शाळेत तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन बक्षीस वितरित करण्यात येतात. त्यात मुलांना प्रोत्साहनपर टीफीन बैग, लंच बॉक्स, कलर पेन, साधे पेन, पाणी बॉटल यासारखे साहित्य वितरित करण्यात येत असल्याची माहिती मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यांनी दिली. अभियाना दरम्यान सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त्तीची शपथ सामाजिक कार्यकर्ता संध्या संभरकर यांच्यामार्फत देण्यात येते. तर मुलांची मौखिक तपासणी विशेषतज्ञ डॉ. अनिल आटे, डॉ. अमोल राठोड व दंत सहायक विवेकानंद कोरे यांचे मार्फत केली जाते.



