गडचिरोलीविदर्भ

भामरागड तालुक्यात विजेबाबतच्या तक्रारी वाढल्या

महावितरणचा कारभार प्रभारींवर ; कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही, ग्राहक त्रस्त 

भामरागड : तालुक्यातील अनेक पदांचा कारभार प्रभारींकडे सोपवून कसा तरी प्रशासनाचा गाडा हाकण्याचे काम केले जात आहे. त्यातच आता महावितरणचीही भर पडली आहे. तालुक्याचे प्रमुख पद असलेल्या उपकार्यकारी अभियंत्याचा प्रभार ६० किमी अंतरावर असलेल्या आलापल्लीच्या अभियंत्याकडे सोपविला आहे. त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी तालुक्यात विजेशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत.

भामरागड तालुक्याला एटापल्ली तालुक्यातील जंगलातून वीज पुरवठा केला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी असणे आवश्यक आहे. महावितरणच्या प्रशासकीय बांधणीत उपकार्यकारी अभियंता हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. या अभियंत्याकडे संपूर्ण तालुक्याच्या विजेची जबाबदारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र, भामरागड येथील उपकार्यकारी अभियंत्याचा प्रभार आलापल्ली येथील उपकार्यकारी अभियंता देवगडे यांच्याकडे सोपविला आहे. आलापल्ली विभागातही वीज लाईन झाडाझुडूपांमधूनच टाकली आहे. तेथे विजेच्या समस्या आहेत. दोन्ही विभागाकडे लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. त्यांचे भामरागड तालुक्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने तालुक्यात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. ते स्वतःच भामरागड येथे पूर्णवेळ उपस्थित राहू शकत नसल्याने कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. स्थानिक अभियंत्याकडे प्रभार सोपविल्यास जनतेसाठी सोयीचे होईल. ते विजेच्या समस्या अधिक सक्षमरीत्या सोडवतील, अशी मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button