महाराष्ट्रात ₹३३,७६८ कोटींची गुंतवणूक ; ३३ हजारांहून अधिक रोजगारनिर्मितीचा संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार
मुंबई : श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने १७ नवीन सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांतून राज्यात तब्बल ३३,७६८.८९ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे ३३,४८३ नवीन रोजगार निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या गुंतवणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक बसेस, ट्रक्स आणि संरक्षण क्षेत्राचा समावेश आहे. यामुळे केवळ पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण यांसारख्या राज्याच्या सर्व भागांमध्ये उद्योगांना चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “आम्ही केवळ कागदावर स्वाक्षऱ्या करून थांबणार नाही. गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर सरकार भागीदार म्हणून सोबत राहील. गुंतवणूकदारांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ‘मैत्री पोर्टल’ सारख्या वन-स्टॉप सुविधा उपलब्ध केल्या आहेत, ज्यामुळे परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळतील.”
फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा धोरणाबद्दलही माहिती दिली. “पूर्वी दरवर्षी विजेचे दर ९ टक्क्यांनी वाढत होते, पण आता ५ वर्षांचा ‘मल्टी-ईयर टॅरिफ’ मंजूर झाल्याने वीज दर कमी होणार आहेत. हा निर्णय उद्योगांसाठी मोठा दिलासा ठरेल,” असे ते म्हणाले.
या करारावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



