चारचाकी वाहन व अवैध दारूसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरअल्लीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने ३ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली गावाजवळ सापळा रचून सुमारे १४ लाख ४०० रुपये किमतीची दारू व ७ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे.
मनोज मजुमदार (४५, रा. एटापल्ली) या दारू पुरवठा दाराला अटक केली आहे. मनोज मजुमदार हा चंद्रपूर जिल्ह्यातून दारू आणून ती एटापल्ली तालुक्यातील दारू विक्रेत्यांना विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पथक मुलचेराकडे रवाना झाले. मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली गावाजवळ सापळा रचून बसले असता, रात्री १२ च्या दरम्यान एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी दारूच्या सुमारे १४२ पेट्या आढळून आल्या. त्याची किंमत १४ लाख ४०० रुपये होते. वाहनाची किमत ७ लाख रुपये एवढी आहे. एकूण २१ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोअं गरफडे, पोअं करमे आणि चापोअं निसार यांनी पार पाडली.



