
बेझलवार महाविद्यालयात ‘छंद वाचनाचा’ या विषयावर चर्चासत्र
अहेरी : वाचन हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जितके वाचू तितका व्यक्ती ज्ञानी होतो’ असे मार्मिक उद्गार प्राचार्य डॉ. सोमकुवर यांनी काढले. श्री. शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालय, अहेरी येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ व ‘स्कूल कनेक्ट 2.0’ या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन NEP 20 नोडल ऑफिसर व कार्यक्रम प्रमुख डॉ. रवींद्र हजारे यांनी विद्यापीठाच्या परिपत्रक व नियोजनानुसार 7 जानेवारी रोजी केले. या निमित्त परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्यात होऊ घातलेले बदल याविषयी माहिती देण्यात आली. याकरिता डॉ. कैलास निखाडे यांना निमंत्रित करण्यात आले. याशिवाय महाविद्यालयाने ‘छंद वाचनाचा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले.
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या विविध पुस्तकांमधील महत्वाच्या प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. रवींद्र हजारे यांनी इंग्रजी पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविले व प्रास्ताविकातून वाचनाचे महत्व सर फ्रान्सिस बेकन यांच्या ‘ऑफ स्टडीज’ या निबंधाच्या आधारे विषद केले तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विष्णू सोनोने यांनी वाचनातून कसे यशस्वी होता येते हे सोदाहरण स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सोमवकुवर यांनी वाचण्या शिवाय तरणोपाय नाहीं, वाचन हीच ज्ञानाची, समृद्धीची व यशाची गुरुकिल्ली आहे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. रूपा घोनमोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रतिभा जवादे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. जी. डी. जंगमवार, प्रा. मंगला बनसोड, डॉ. कैलास निखाडे आणि प्रा. विष्णू सोनोने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. गौरकर. प्रा. गौरव तेलंग, प्रा. पेंदाम यांनी श्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्धल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.



