
आ. डॉ. मिलिंद नरोटे यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीतर्फे निवेदन
चामोर्शी : तालुक्यातील चित्तेकनार गावातील कित्येक नागरिक शासकीय योजनेपासून व लाभापासून वंचित आहेत व त्या गावांमध्ये अनेक समस्यांचा डोंगर आहे. गावातील विविध समस्या सोडवण्याची मागणी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीतर्फे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदनातून करण्यात आली.
पिण्याच्या पाण्याची टाकी फक्त शोभेची वस्तु बनली आहे, नळाला अद्यापही पाणी येत नाही, गावात घरोघरी नळ योजना सुरू करा, घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या गरजू कुटुंबाना घरकूल द्या, गावातील विकासकामावर भर देऊन सीसी रोड व नाली बांधकाम करा, चित्तेकनार ते पूले नदीपर्यंत रोड रुंदीकरण करा, सभामंडपाची तसेच गावामध्ये सामूहिक शौचालयाचे बांधकाम करा, युवा तसेच सुशिक्षित, शिक्षित मुलांना व्यायाम शाळा, अभ्यासिका, क्रीडांगण उपलब्ध करून द्या, जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत नसल्याने ते त्वरीत मंजूर करून बांधकाम करावे, आदिवासी परंपरा प्रमाणे कुर्माघराची गरज, 2006 अतिक्रमण वनपट्टे मिळाले नाहीत अशा लोकांना त्वरीत वनपट्टे मिळवून द्यावे, गावामध्ये वाढीव विद्युत पोल तसेच चौकात लाईट व्यवस्था उपलब्ध करून द्यावे, तलाठी साजा क्र. 2 चे तलाठी हे नेहमी गैरहजर असतात, तसेच मुख्यालय राहत नाही, त्यामुळे नागरिकांचे वेळेवर काम होत नाही, कुथेगाव ग्रा.पं. अंतर्गत झालेल्या संपूर्ण नालीचे कित्येक वर्षापासून उपसा झालेले नाही. या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या तातडीने सोडवाव्यात या उद्देशाने निवेदन देऊन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे, जिल्हा उपाध्यक्ष सूरज गुंडमवार, जिल्हा सचिव रोशन कवाडकर, शहर प्रमुख कमलेश बोरूले उपस्थित होते.



