
घराच्या बांधकामावर पाणी मारताना घडली घटना
तुमसर : तालुक्यातील आलेसूर येथे घराच्या बांधकामावर पाणी मारताना तरुणाचा मृत्यू झाला. अकलेश काशिराम नरखडे असे या तरुणाचे नाव असून त्याचे वय अवघे २७ वर्षे आहे. बुधवारी ही दुर्घटना घडली.
काशिराम नरखडे यांच्याकडे जवळपास २ एकर शेतजमीन असून, ते शेतीसोबतच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून अकलेश नरखडे हा शेतीसोबतच मजुरीचे काम करीत होता. घराच्या नवीन बांधकामावर पाणी मारत असतानाच अकलेशला जोरदार विद्युत धक्का बसला. त्यात तो सांदवाडीतच कोसळला. तो सांदवाडीत पडून असल्याचे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, लेंडेझरी येथे नेले डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. प्रेत विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. सायंकाळी शोकाकूल वातावरणात आलेसूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. मृतक अविवाहित होता. तपास उपपोलिस निरीक्षक भास्कर भोंगाडे व पोलिस हवालदार किशोर खोब्रागडे करीत आहेत.
यावर्षी काशिराम नरखडे यांनी घराच्या बांधकामाला सुरुवात केली होती. घराचे बांधकाम सुरू असल्याने बांधकामावर मोटारपंपाद्वारे पाणी मारण्यासाठी सांदवाडीत असलेल्या एका भिंतीवर इलेक्ट्रिक बोर्ड लावून त्यावरून कनेक्शन घेऊन तो नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत होता. रोजच्याप्रमाणे पाणी मारण्यासंबंधी मोटारपंप सुरू करण्यासाठी बोर्डाला इलेक्ट्रिक वायर लावत असताना ही घटना घडली.



