
पोलीस तक्रारीवरून होता संताप ; पत्नी, मेव्हण्याची हत्येसाठी मदत
नागपूर : काही काळापासून सुरू असलेल्या वादातून एका आरोपीने कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून जुन्या मित्राला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तकिया येथे ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
लकी ऊर्फ करण राजेश नायनेकर (२८, तकिया) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा मित्र कुणाल राऊत हा आरोपी आहे. कुणालने पत्नी काजल, मेहुणा योगेश कोवे व आणखी एक नातेवाईक रुपेश वाघाडे यांच्यासोबत मिळून ही हत्या केली. कुणाल व लकी जुने मित्र होते. दिवाळीच्या कालावधीत दोघांमध्ये दारूवरून वाद झाला होता. कुणालने लकीविरोधात तक्रार केली होती.
ऑक्टोबर महिन्यात दारूच्या नशेत लकीने कुणालसोबत वाद घातला होता. आज मी दांड्याने तुला संपवतोच अशी धमकी त्याने दिली होती. ते पाहून कुणालच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लकीने कुणाल व त्याच्या आईवर विटेने हल्ला केला होता.
मंगळवारी रात्री अकरा वाजता लकी हा तकिया मैदानावर मित्रासोबत बसला होता. तेथे कुणाल राऊत पोहोचला असता लकीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये हाणामारी झाली. त्याचवेळी तेथे इतर आरोपी पोहोचले. त्यांनी लकीला पकडले व कुणालने चाकूने वार केले. यात लकी गंभीर जखमी झाला. तेथून आरोपी फरार झाले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. लकीला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत चारही आरोपींना अटक केली आहे.



