
लाकूड व्यापाऱ्याला लाच मागितल्याचे प्रकरण ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी मागावर
चंद्रपूर : खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन लाकूड व्यापाऱ्याला लाच मागितल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिस स्टेशन येथील पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र कारवाईच्या दिवशीपासून तो पोलिसांना गुंगारा देत आहे. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्याच्या मागावर आहे. परंतु, त्यांना अद्यापही त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. लाकूड व्यापाऱ्याने थकीत पैसे देत नसल्याने एका व्यापाऱ्याविरुद्ध पीएसआय हुसेन शहा याच्याकडे तक्रार अर्ज केला होता.
दोन्ही व्यापाऱ्यात सेटलमेंट झाल्याने त्यांनी तो तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज केला. परंतु, पीएसआय हुसेन शहा यांनी त्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. नाहीतर वरिष्ठांना सांगून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
याबाबतची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करताच त्यांनी १३ जानेवारीला कारवाई करण्याचा अनुषंगाने सापळा रचला. मात्र याबाबतची कुणकुण त्याला लागताच तो पसार झाला. तेव्हापासून चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत.



