
देसाईगंजमध्ये ‘विकसित भारत संकल्प सभा’ संपन्न: ‘जन धन’ आणि ‘आयुष्मान भारत’ सारख्या योजनांचा उल्लेख
देसाईगंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने सर्वांगीण आणि समावेशक विकासाची नवी उंची गाठली आहे. गरीब, शेतकरी, महिला यांच्या उन्नतीसाठीच्या कल्याणकारी योजना असोत किंवा आर्थिक विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास असो, प्रत्येक क्षेत्रात दमदार काम झाले आहे. या काळात, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, आम्ही जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम “जन धन योजना” आणि आरोग्य क्षेत्रासाठी “आयुष्मान भारत योजना” जनतेपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवली, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
१६ जून रोजी देसाईगंज येथील सिंधू भवन येथे आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा’ कार्यक्रमाप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. गजबे यांनी पुढे म्हटले की, गेल्या ११ वर्षांत पंतप्रधानांनी त्यांच्या धोरणांद्वारे आणि कृतींद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांच्यासाठी भारताचे आणि भारतीयांचे कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे.
यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भूरसे, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, भाजप जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष शालू दंडवते तसेच देसाईगंज तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, देसाईगंज तालुक्यातील मौजा कुरुड ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच सौ. प्रीतीताई मडावी यांचा उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सचिन खरकाटे यांनी केले, तर सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांनी केले. आभार चैतनदाजी विधाते यांनी मानले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी केले.



