
ग्राम नागरा येथील कारवाई : पाच जुगारी पसार तर दोघे आले हातात
गोंदिया : शेतशिवारातील खुल्या जागेत पत्ते कुटत बसलेल्या सात जुगाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१५) करण्यात आली असून यातील पाच जुगारी पसार झाले तर दोघे रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागले.
ग्राम नागरा येथील शेतशिवारातील मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड घातली असता आरोपी बुधराम आत्माराम तिवडे (२४, रा. चांदणीटोला-नागरा), महेंद्र किशोर तिवडे (३६, रा. नागरा), राजा नेवारे (३८, रा.) दीपक लिल्हारे (२५), पंकज लिल्हारे (२५), शेखर दमाहे (२७) व आशिष लिल्हारे (२५, रा. चांदणीटोला) हे जुगार खेळताना दिसून आले. यातील बुधराम तिवडे व महेंद्र तिवडे पोलिसांच्या हाती लागले तर उर्वरित पोलिसांनी बघून पसार झाले. आरोपींवर पोलिस उपनिरीक्षक प्रीतम येरणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी अंगझडतीत रोख चार हजार रूपये, जुना वापरता मोबाइल किमत नऊ हजार रुपये, मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-वाय ०९५६ किमत ४५ हजार रुपये, जुना मोबाइल किमत सात हजार ५०० रुपये, ५२ तासपत्ते, प्लास्टिक बोरी, फडावर रोख ५०० रुपये असा एकूण ६६ हजार १०० रुपयांचा माल जप्त केला आहे.



