चंद्रपूरविदर्भ

रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर सिंदेवाहीजवळील घटना

चंद्रपूर : विदर्भात वाघाच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीजवळ झालेल्या घटनेची भर पडली आहे. या मार्गावरील ट्रेनच्या धडकेने वाघाचा मृत्यू झाला आहे. बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावरील सिंदेवाही ते आलेवाही स्थानकादरम्यान रविवारी सकाळी रेल्वे रुळाजवळील झुडपात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. या मार्गावरून जाणाऱ्या रक्सौल एक्स्प्रेसची धडक बसल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

दक्षिण पुर्व मध्य रेल्वे, बिलासपुर झोन अंतर्गत गोंदिया नागभीड-चांदाफोर्ट- बल्लारशाह हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जंगलव्यात आहे. त्यातही नागभीड- चांदाफोर्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जात असून, ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्याला लागूनच आहे. या रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी वाघ, हरिण, रानगवे, अस्वल यासारखे वन्यप्राणी अपघातात मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरील वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीचे मार्ग शोधण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते व त्यानुसार काही ठिकाणी अंडरपास व बाजूला तार फेन्सिंग करण्यात यावे असे सुचविले गेले असल्याची माहिती आहे.

मात्र, रेल्वे प्रशासन व वनविभाग यांच्या योग्य समन्वयाअभावी या उपाययोजना संदर्भात अद्याप कोणताही तोडगा किंवा निर्णय होऊ शकलेला नाही. सोबतच या मार्गावरील अपेक्षित दुहेरीकरण रेल्वे मार्ग तयार करण्यासाठीचेही प्रयत्न झाले नाही. भविष्यात नागपुर नागभीड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर बल्लारपुर मार्गासाठी या लाईनचा पर्यायी मार्ग म्हणून वापर होणार आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे मत रेल्वे झोनचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button