गडचिरोलीविदर्भ

‘विश्वकोश प्रत्येक घरी’ ही संकल्पना ज्ञानदायी ठरेल – डॉ. रवींद्र शोभणे

गोंडवाना विद्यापीठात मराठी विश्वकोश परिचय कार्यशाळा

गडचिरोली : विश्वकोशाचे खंड हे उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ असून यामधील नोंदींमध्ये विश्वासार्हता असते. अचूक संदर्भ तसेच माहितीसाठी प्रत्येकाच्या घरी मराठी विश्वकोश असणे आवश्यक आहे. ‘विश्वकोश प्रत्येक घरी’ या संकल्पनेतून प्रत्येक घरी विश्वकोश पोहचल्यास ही संकल्पना ज्ञानदायी ठरेल, असे मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

गोंडवाना विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व  पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी विश्वकोश परिचय कार्यशाळा” घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्‍याम खंडारे, सहायक सचिव ललीत कुडमथे, विद्याव्यासंगी सहायक तथा कार्यशाळेचे समन्वयक रवींद्र घोडराज, समन्वयक डॉ. सविता गोविंदवार, विद्याव्यासंगी सहायक सरोजकुमार मिठारी, आयक्यूएसीचे संचालक डॉ. धनराज पाटील, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

शोभणे म्हणाले, सध्याच्या काळात माहितीचा भडीमार विविध आभासी माध्यमातून होत असतो. अशावेळी माहितीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता ही विश्वकोशातूनच सिध्द होते.

विश्वकोशातील नोंदी आद्ययावत करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ आणि अधिनस्त महाविद्यालयातील विषय तज्ज्ञांना अधिक अधिक संख्येने सहभागी होण्याचे अनिल हिरेखण यांनी आवाहन केले.

द्वितीय सत्रामध्ये डॉ. गजानन कोर्तलवार यांनी अभिजात मराठी आणि विश्वकोश नोंदींचे महत्त्व या विषयावर, विद्याव्यासंगी सहायक सरोजकुमार मिठारी यांनी मराठी विश्वकोश आणि लेखन संहिता या विषयावर आणि विद्याव्यासंगी सहायक डॉ. स्नेहा खोब्रागडे यांनी कुमार विश्वकोश आणि विज्ञान विषयक नोंदींचे लेखन या विषयावर मार्गदर्शन केले.

उद्घाटन संत्राचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पा आठवले तर समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल चव्हाण यांनी केले. उद्घाटकीय सत्राचे आभार डॉ. सविता गोविंदवार यांनी तर समारोपीय सत्राचे आभार प्रा. धैर्यशील खामकर यांनी मानले.

कार्यशाळेतील सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेसाठी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्यासह विद्याव्यासंगी सहायक आनंद गेडाम, अनिरुध्द गचके, डॉ. नीळकंठ नरवाडे, डॉ. हेमराज निखाडे, डॉ. प्रिती काळे-पाटील, डॉ. प्रशांत सोनावणे, डॉ. देवदत्त तारे, प्रा. संदीप कागे, नंदकिशोर मेश्राम, प्रा. विकास पुनसे व मराठी विभागातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेस विद्यापीठातील तसेच अधिनस्त महाविद्यालयांमधील प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button