गोंदियाविदर्भ

राष्ट्रीय लोकअदालतीत १३,७९८ प्रकरणांचा निपटारा ; ४२.५२ कोटींची विक्रमी वसुली

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या हस्ते उद्घाटन ; सामोपचाराने मिटले वर्षांनुवर्षांचे वाद

गोंदिया : वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळून प्रलंबित खटल्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय लोकअदालती’ला गोंदिया जिल्ह्यात अभूतपूर्व यश लाभले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने १४ मार्च रोजी आयोजित या लोकअदालतीत एकूण १३,७९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्याद्वारे तब्बल ४२ कोटी ५२ लाख ७ हजार ६७६ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या शुभहस्ते लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन. के. वाळके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना श्री. जोशी यांनी लोकअदालतीचे महत्त्व सांगताना ‘सामोपचार हाच वादाचा सर्वोत्तम अंत’ असल्याचे अधोरेखित केले.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित आणि दाखलपूर्व (Pre-Litigation) अशा ३८,३३४ प्रकरणांना चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. प्रलंबित प्रकरणे: १,८७३ प्रकरणे निकाली काढून ४०.५९ कोटी रुपयांची वसुली झाली. दाखलपूर्व प्रकरणे: बँक, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाच्या ११,९२५ प्रकरणांचा निपटारा होऊन १.९२ कोटी रुपये वसूल झाले. स्पेशल ड्राईव्ह: ३६५ फौजदारी प्रकरणांपैकी ३२१ प्रकरणे निकाली काढून पक्षकारांना मानसिक त्रासातून मुक्त करण्यात आले.

या लोकअदालतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महावितरण, टेलिफोन आणि बँकांचे थकीत देयके ज्या पक्षकारांनी तडजोडीनुसार पूर्ण जमा केली, त्यांची प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढण्यात आली. यामुळे भविष्यातील न्यायालयीन खर्च आणि फेऱ्यांपासून पक्षकारांना कायमची सुटका मिळाली आहे.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश ए. सी. खुराणा, डी. बी. हरणे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी आणि पॅनल वकिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक ए. आर. कुकडे, विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, पॅरा लिगल व्हॉलेंटियर्स आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

न्यायालयातील दीर्घकालीन संघर्षातून बाहेर पडून सामंजस्याने प्रकरणे मिटल्यामुळे शेकडो पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून, गोंदिया जिल्ह्यासाठी हा एक ऐतिहासिक निकाल ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button