ड्राय क्लिनींगच्या दुकानातून पाच कोटींची रक्कम जप्त

बँकेच्या व्यवस्थापकासह पाच ते सहा जण पोलिसांच्या ताब्यात
तुमसर : पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुमसर शहरातील इंदिरानगरात असलेल्या राजकमल ड्रायक्लीनर्स आर्ट या दुकानावर धाड टाकून पोलिसांनी पाच कोटींची रक्कम जप्त केली. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या मोहिमेला दिशा देण्यात आली.

दुकानाचे संचालक जगदीश काटकर यांना या रकमेविषयी चौकशी केली. मात्र, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. याप्रकरणी अॅक्सिस बँकेच्या तुमसर येथील व्यवस्थापकासह इतर पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अॅक्सिस बँकेचे रिजनल व्यवस्थापक, तसेच रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोट, भंडारा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, प्रदीप शहारे, पंकज भित्रे, सचिन देशमुख, रवींद्र गभने, सचिन सरोदे, राजेंद्र ठाकरे, देवेंद्र चामट, विजय आरणे यांनी केली.
या संपूर्ण घटनाक्रमात तुमसर येथील अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुण्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून या व्यवस्थापकाने ही रक्कम बँकेतून अनधिकृतपणे काढली होती.
‘त्या’ व्यक्तीला ही रक्कम दिल्यावर बदल्यात त्याला सहा कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर मिळालेल्या रकमेतून पाच कोटी बँकेत जमा करून व्यवस्थापकाला एक कोटी रुपयांचे कमिशन मिळणार होते. मात्र, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आणि हा प्रकार उघडकीस आला.
दुकानात आढळलेली रक्कम हाताने मोजणे शक्य नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने पैसे मोजण्याची मशीन दुकानातच बोलावली. या मशीनवर ही रक्कम मोजण्यासाठी सुमारे दोन तास लागले. ही रक्कम पाच कोटी रुपये भरली. त्यात १०० आणि ५०० रुपयांची बंडले होती.
प्राप्त माहितीनुसार, सीजी ०४/एमझेड २००६ क्रमांकाच्या कारमधून ही रक्कम ड्रायक्लीनर्समध्ये आणल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे. छत्तीसगड पासिंग असलेली ही कार कुणाची, हे मात्र पुढे आलेले नाही. ड्रायक्लीनरच्या मालकाचे आणि बँक व्यवस्थापकाचे नेमके काय कनेक्शन आहे, याचाही तपास पोलिस करीत आहेत.



