क्राईमनागपूरविदर्भ

दोन लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकाला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच

नागपूर : पोलिस विभागातील भ्रष्टाचारी तत्त्वांचा मुद्दा परत एकदा समोर आला आहे. कोराडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या सेटिंगच्या बदल्यात आरोपी सहायक पोलिस निरीक्षकाने पैसे मागितले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रेमानंद दादाराव कात्रे (४३) असे आरोपी सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. एका व्यक्तीविरोधात मौजा कवठा, कामठी येथील संयुक्त मालकीच्या शेतीच्या विक्रीपत्राच्या व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेकडून आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची भीती कात्रेने दाखविली होती. जर गुन्हा दाखल करायचा नसेल व प्रकरण दाबायचे असेल तर दोन लाख रुपये लागतील असे कात्रेने संबंधित व्यक्तीला म्हटले होते. संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणाची प्राथमिक शहानिशा करून एसीबी पथकाने सापळा रचला. बुधवारी दुपारच्या सुमारास कोराडी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीकडून दोन लाखांची लाच स्वीकारली असता एसीबीच्या पथकाने कात्रेला रंगेहाथ पकडले. कात्रेविरोधात कोराडी पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रीती शेंडे, नीलेश उरकुडे, भरत ठाकूर, भागवत वानखेडे, हेमराज गांजरे, दीपाली भगत, विजय सोळंके यांनी ही कारवाई केली.

एसीबीकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीला जाळ्यात ओढण्यासाठी कात्रेने सेटिंग करून देण्याचे आश्वासन दिले. जमीन प्रकरणात तक्रार करणाऱ्या महिलेची समजूत काढून दिला तक्रार मागे घेण्यास लावेन, असे कात्रेने संबंधित व्यक्त्तीला सांगितले होते. संबंधिताने अगोदर पैसे देण्यास नकार दिला होता व गावातीलच सरपंचाच्या मदतीने प्रकरण सोडविण्याची भाषा केली होती. मात्र, तत्काळ अटक करण्याची धमकी कात्रेने दिल्याने संबंधित व्यक्तीने अखेर एसीबीकडे धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button