
परीक्षेच्या अनुषंगाने आढावा बैठक
भंडारा : जिल्ह्यातील इयत्ता पाचवी व आठवीचे एकूण 13916 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 09 फेब्रुवारी 2025 रोजी रविवारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता – 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता – 8 वी) आयोजित करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात इयत्ता – पाचवीचे 8060 व इयत्ता – आठवीचे 5856 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा इयत्ता – 5 वी साठी 57 व इयत्ता – 8 वी साठी 40 परीक्षा केंद्रांवर संपन्न होणार आहे. इयत्ता – पाचवीच्या परीक्षा केंद्रांवर 407 पर्यवेक्षक व 111 शिपाई तर इयत्ता – आठवीच्या परीक्षा केंद्रांवर 297 पर्यवेक्षक व 78 शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 1 सकाळी 11:00 ते 12:30 व पेपर क्रमांक 2 दुपारी 02:00 ते 03:30 या वेळेत संपन्न होणार आहे. परीक्षार्थ्यांना सकाळी 10:30 पासून व दुपारी 01:30 पासून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि, परीक्षा सुरू झाल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्यात येणार नाही.
सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा व तालुका स्तरावरून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या परीक्षा केंद्रावर भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात, गैरप्रकारांविना व्हावी, या उद्देशाने पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई यांना परीक्षा कालावधीत मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात येणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, भंडारा येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा समन्वयक रवींद्र सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालकांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) विनायक वंजारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी व केंद्र संचालकांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गोपनीय व अगोपनीय साहित्याचे वाटप करण्यात आले.



