गोंदियाविदर्भ

नागरिकांच्या आरोग्याची माहिती होणार संकलीत

सांख्यिकी विभागामार्फत सर्वेक्षण : प्रत्यक्ष गृहभेटी देऊन घेणार माहिती

गोंदिया : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे राष्ट्रीय नमूना सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळा केली जाणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई कार्यालयामार्फत गोंदिया जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2025 अखेर संबंधित विभागाचे अधिकारी कुटूंबाच्या प्रत्यक्ष घरी भेट घेऊन माहिती गोळा करण्याचे काम करणार आहेत.

निवड झालेल्या कुटूंबाकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटूंबाच्या आरोग्य विषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. पाहणीनंतरच्या निष्कर्षामधून केंद्र व राज्य शासनास आरोग्य सेवा सुधारणा व नियोजनासाठी तसेच त्याबाबत धोरणे राबवण्यासाठी उपयुक्त माहिती मिळणार आहे. ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या उपचारावर होणारा खर्च, कुटूंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे.

सदर सर्वेक्षणाअंतर्गत कुटूंबाची निवड ‘एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटूंब आणि मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटूंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्याअनुषंगाने माहिती संकलीत करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे 7 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटूंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहीत नमुन्यातील माहिती गोळा करतील.

नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटूंबाकडून प्राप्त माहितीवर आधारीत निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरीता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कुटूंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्य विषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व संबंधित कुटूंबियांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन सुनिल धोंगडे, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गोंदिया यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button