गडचिरोलीविदर्भ

चतुरस्त्र विद्यार्थी घडविण्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका – साहित्यिक प्रा. डॉ. श्याम मोहरकर

गोंडवाना विद्यापीठामध्ये युवा महोत्सवाचे उद्घाटन

गडचिरोली : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक, कलात्मक व जीवनात्मक ज्ञानदान देऊन आपला विद्यार्थी चतुरस्त्र बनावा यासाठी गोंडवाना विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन साहित्यिक व नाट्य कलावंत प्रा. डॉ. श्याम मोहरकर यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठामध्ये विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आयोजित आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव २०२४-२५ (भरारी) चे उ‌द्घाटन नुकतेच प्रा. डॉ. श्याम मोहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे हे होते. यावेळी झाडीपट्टीचे नाट्य कलावंत डॉ. शेखर डोंगरे, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. श्याम मोहरकर म्हणाले, आजच्या युगामध्ये माणसापेक्षा पदाला जास्त महत्त्व आहे. पद गेले की आपोआपच मान, सन्मान निघून जातो परंतु कलाकार म्हणून सदैव आपल्याला सन्मान व प्रतिष्ठा मिळत राहते. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कलात्मक युवा महोत्सव निश्चितच विद्यार्थ्यांना एक वेगळी ओळख निर्माण करुन देईल.

प्रमुख अतिथी डॉ. शेखर डोंगरे म्हणाले, चांगल्या कलाकाराबरोबरच चांगला व्यक्ती होणे आवश्यक असून कलाकार होण्यासाठी संयम व प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत असे विशद करून त्यांनी झाडीपट्टी रंगभूमी विषयक विस्तृत माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक पावले उचलत असून युवा महोत्सवामधून निश्चितच गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी उत्कृष्ट कलाकार म्हणून नावारुपास येतील अशी आशा प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त करुन सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

महोत्सवामध्ये लोकनृत्य, मूकनाट्य, नकला, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा,गीत गायन, संगीत, फाईन आर्ट, एकांकीका या स्पर्धा होणार असल्याची माहिती डॉ. प्रिया गेडाम यांनी प्रास्ताविकामध्ये दिली. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा आठवले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहा. प्रा. राहूल ढबाले यांनी करुन दिला तर आभार सहा. प्रा. रोहित बापू कांबळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, विविध महाविद्यालयांचे सांस्कृतिक समन्वयक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button