
घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त
गडचिरोली : बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात झालेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. परिसरात शोधमोहीम सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या आधी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर सैनिकांनी चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चकमकीच्या ठिकाणाहून सुरक्षा दलांनी अनेक स्वयंचलित शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. चकमकीत अनेक वरिष्ठ नक्षलवादी कमांडरही सामील असल्याचे मानले जात आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. परिसरात शोधमोहीम सुरु असून पोलीस प्रशासनाने आजूबाजूच्या भागात गस्त वाढवली आहे आणि सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे.



