गडचिरोलीविदर्भ

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात

‘योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीसह मिळते मानसिक शांती‘; जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व समान-किमान कार्यक्रम माहे जून-२०२६ अंतर्गत, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये २१ जून रोजी गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा न्यायालय परिसरामध्ये आयोजित या विशेष योग शिबिराला न्यायाधीश, अधिवक्ता आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो आणि योग देखील माणसाचे आयुष्य दीर्घायुषी करतो, हाच दुहेरी संयोग साधत दरवर्षी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. २१ जून २०१५ रोजी जगभरात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला होता, तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम विधी विभागाच्या वतीनेही नियमितपणे राबविला जातो.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. पी. खानोरकर, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. सदाफळे, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. विजयकर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी योगा मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या पतंजली योग समितीच्या (महिला विभाग) जिल्हा प्रभारी किरण राजेशसिंग पवार आणि योग शिक्षिका नैना कोलते यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

या योग शिबिराच्या माध्यमातून उपस्थित न्यायिक अधिकारी, वकील व कर्मचाऱ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत मोलाचा संदेश देण्यात आला. “योगा केवळ शारीरिक तंदुरुस्ती आणत नाही, तर माणसाला सर्वोच्च मानसिक शांती प्रदान करतो. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात मन शांत ठेवण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. सुख, दुःख, प्रेम यांसारख्या मानवी जीवनातील सर्व अभिव्यक्तींवर आणि शरीराच्या सर्व क्रियाकल्पांवर योगाचे नियंत्रण असते. नियमित योगासने केल्यामुळे वजन नियंत्रित राहते, चिंता दूर होते, आत्मबळ व रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरात नवीन ऊर्जेचा संचार होऊन जीवन जगण्याचा उत्साह द्विगुणित होतो,” असा सूर या शिबिरातून उमटला.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्हा न्यायालयातील सन्माननीय अधिवक्ता गण, विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी आणि न्यायालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button