
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. बालाजी चिरडे यांनी मार्गदर्शन केले.
मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट (MEME) ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील महत्त्वाची तरतूद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रवेश आणि बाहेर पडता येते. शिक्षण प्रणालीमध्ये लवचिकता आणणे आणि विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. एमईएमई अंतर्गत, विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची आणि ते पूर्ण केल्यानंतर पदवी किंवा पदविका मिळविण्याची सुविधा मिळते. एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्याही कारणास्तव त्याचे शिक्षण अर्धवट सोडल्यास, त्याने आधीच मिळवलेल्या क्रेडिट्सवर आधारित प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा मिळू शकतो.
MEME विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने आणि आवश्यकतेनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. हे विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे जे विविध कारणांमुळे त्यांचे शिक्षण नियमितपणे चालू ठेवू शकत नाहीत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आणि पीएम उषा समन्वयक डॉ. प्रितेश जाधव उपस्थित होते. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. निळकंठ नरवाडे यांनी कार्यक्रमाची यशस्वी व्यवस्था केली. डॉ. धनराज पाटील हेही कार्यक्रमाला उपस्थित होते.
डॉ. चिरडे यांनी Capacity Building workshop on ‘MEME’ (multiple entry multiple exit) या विषयावर मार्गदर्शन केले, ज्यामुळे सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. कार्यशाळेत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
प्राध्यापक अमोल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर डॉ. निळकंठ नरवाडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या ज्ञानात भर पडली, असे उपस्थितांनी सांगितले.



