
गडचिरोली : जिल्ह्यात गर्भलिंग निदानाला पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला असून, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गर्भधारणेपूर्वी किंवा प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची माहिती देणाऱ्या नागरिकाला जिल्हा प्रशासनाकडून तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय राखली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे किंवा यासाठी मदत करणे हे ‘गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा १९९४ व सुधारित कायदा २००३’ नुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही डॉक्टर, तांत्रिक कर्मचारी किंवा इतर व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांना १ लाख रुपयांपर्यंत दंड आणि २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
डॉ. किलनाके यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांना कुठेही बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा केंद्रांची माहिती मिळाली, तर त्यांनी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणीही असू शकते. प्रशासनाकडून त्यांच्या सुरक्षिततेची आणि गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाईल.
या संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक आणि संकेतस्थळ जारी केले आहेत. इच्छुक नागरिक १८००२३३४४५४५ / १०४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याव्यतिरिक्त, http://amchimulagimaha.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल. अधिक माहितीसाठी किंवा थेट तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. माधुरी किलनाके यांनी केले आहे.



