
गोंदिया : घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास विशेष सत्र न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सालेकसा तालुक्यात ४ मार्च २०२१ रोजीचे हे प्रकरण असून, न्यायालयाने मंगळवारी (दि. ११) त्यावर सुनावणी केली. शत्रुघ्न छन्नुलाल गौतम (३८, ता. सालेकसा), असे आरोपीचे नाव आहे.
प्रकरण असे की, ४ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ ते १० वाजता दरम्यान फिर्यादी पीडित मुलीचे (१७) आई-वडील रोजगार हमी योजनेच्या कामावर गेल्याने ती घरी एकटीच होती. ही संधी साधून आरोपी शत्रुघ्न गौतम घरात शिरला व पीडितेचा हात पकडून तिला लैंगिक सुखाची मागणी करून विनयभंग केला होता. या घटनेची माहिती फिर्यादीने ५ मार्च रोजी आई-वडिलांना दिली. त्यावरून फिर्यादी व तिच्या आई- वडिलांनी आरोपीविरुद्ध सालेकसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासी पोलिस अधिकारी भीष्मराज सोरते यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात कलम ३५४, ३५४ (अ), ४५२ भादंवि तसेच कलम १२ पोक्सो कायद्यान्वये दोषारोपपत्र सादर केले होते. आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार तथा पीडित पक्षातर्फे सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी एकूण सहा साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर सादर केली. आरोपीचे वकील व पीडित फिर्यादीतर्फे सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश यांनी आरोपीविरुद्ध सरकार पक्षाचा युक्तिवाद व इतर कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरून आरोपी शत्रुघ्न गौतम यास भारतीय दंड विधानाचे कलम ३५४ अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच भारतीय दंड विधानाचे कलम ३५४-अ (२) अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.



