
आरमोरी : महाविद्यालयाच्या स्थापनेपासून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता टिकून राहत नाही. अति आनंदाने, जुन्या शिक्षकांशी संपर्क तोडल्याने, छोट्या नोकरीत समाधान मानल्याने पुढे विद्यार्थी मागे पडतात. काही अल्पसंतुष्ट विद्यार्थी तेवढ्यातच समाधान मानतात परंतु गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेत मिळालेले यश स्पर्धा परीक्षेतही टिकवून ठेवले तर अनेक विद्यार्थी सरकारी अधिकारी म्हणून चमकले असते. महाविद्यालयातून निघालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या संपर्कात राहून गुणवत्तेत सातत्य टिकवून ठेवले पाहिजे. यामुळे केवळ संस्था किंवा महाविद्यालयाचे नाव उज्वल होत नाही तर आई-वडील, गावाचे आणि परिसराचे नाव सुद्धा उज्वल होईल, असे प्रतिपादन मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी यांनी केले.
संस्थापक अध्यक्ष वामनराव वनमाळी यांच्या १९ व्या पूर्णस्मरण दिनानिमित्ताने गुणवत्ता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून इतरांनी त्यांची प्रेरणा घेण्याची सूचना केली. माजी संस्थापक अध्यक्षांना अभिवादन केले आणि आयोजकाचे व प्राचार्यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता वनमाळी, संस्थेचे सचिव मनोज वनमाळी, दीपक वनमाळी, अशोक वनमाळी, संस्थेचे पदाधिकारी उमाकांत वनमाळी, हरिश्चंद्र बोंद्रे, श्रीकांत वनमाळी, मयूर वनमाळी, राजा गारोदे, अशोक वनमाळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, महात्मा गांधी कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पंधरे त्याचप्रमाणे वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य नितीन कासार उपस्थित होते.
या निमित्ताने महाविद्यातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये भाग्यश्री खळहा बी.ए. भाग ३, गायत्री बेहेरे बी.एस्सी. भाग ३, प्रेरणा देविकर बी.कॉम. भाग ३, सुमित रामटेके एम.ए. अर्थशास्त्र, माधुरी रामटेके एम.ए. इतिहास, जितेंद्र मरगाये एम. ए. मराठी, अक्षय मारबते एम.ए. समाजशास्त्र, मार्टिना घोनमोडे एम.एस्सी. रसायनशास्त्र, काजल चौधरी एम.एस्सी. भूगर्भशास्त्र, स्नेहा सोनटक्के एम.एस्सी. गणित व तेजस्वी कुर्झेकर एम.एस्सी. प्राणीशास्त्र यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. भजन गायन चमूस मनोज वनमाळी यांनी १५०० रु. भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन गोंडाणे तर आभार डॉ. विजय रेवतकर यांनी मानले. संस्थेचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.



