चंद्रपूरविदर्भ

मधमाश्यांच्या हल्ल्यात दोन वनकर्मचारी जखमी

जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले

सावली : गस्त घालत असताना मधमाश्यांनी हल्ला केल्याने दोन वन कर्मचारी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पेंढरी जंगलात घडली. वनरक्षक दिवाकर गुरनुले (५२) व वनमजूर मिथुन पेंदाम (३०, रा. पेंढरी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

सावली तालुक्यातील पाथरी, पेंढरी व्याहाड, राजोली क्षेत्रात वनाचे संरक्षण व संगोपनाची कामे सुरू आहेत. उपक्षेत्र पेंढरी येथील वनरक्षक दिवाकर गुरनुले व वनमजूर मिथुन पेंदाम हे दोन कर्मचारी जंगलात गस्त घालत होते. दरम्यान, चक मानकापूर येथून पेंढरीकडे येत असताना झाडावर बसलेल्या मधमाश्यांनी हल्ला केला. घटनास्थळ निर्जन असल्याने मधमाश्यांच्या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करणे अशक्य झाले होते.

पेंढरी जंगलात मधमाश्यांचे पोळे अनेक ठिकाणी दिसून येतात. वन कर्मचारी जीव मुठीत ठेवून गस्त घालत आहेत. मधमाश्यांनी हल्ला केल्याने वनमजूर धास्तावले आहेत. जखमी झालेले वनरक्षक दिवाकर गुरनुले व वनमजूर मिथुन पेंदाम यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती पेंढरी मक्ता उपवनक्षेत्र कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button