गडचिरोलीविदर्भ

चामोर्शी, आष्टी, घोट परिसरात खतांचा मोठा तुटवडा ; शेतकरी संकटात

जादा दराने विक्री होत असल्याचा आरोप, चौकशीचे निर्देश

भाजप उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची तातडीने पुरवठ्याची मागणी

गडचिरोली : सध्या रोवणीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खतांची नितांत गरज असताना, ऐन हंगामात चामोर्शी, आष्टी आणि घोट परिसरात खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी, आष्टी, घोट परिसरात जनसंपर्क दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन खतांच्या तुटवड्याबाबतची समस्या जाणून घेतली आणि या परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दरात तातडीने गरजेच्या प्रमाणात खतपुरवठा करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

डॉ. होळी यांनी निदर्शनास आणले की, खतांचा तुटवडा होत असल्याने कृषी केंद्र विक्रेते जादा दराने खतांची विक्री करत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. धान आणि कापसाच्या पिकाला फवारणीसाठी खताची आवश्यकता असताना, खत खरेदीला गेल्यानंतर विक्रेते खतांचा तुटवडा असल्याचे सांगत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भाव देऊन खते खरेदी करावी लागत आहेत, ज्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

डॉ. होळी यांनी कृषी अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन चामोर्शी, आष्टी, घोट परिसरात खतांचा योग्य पुरवठा करावा, तसेच खतांचा कृत्रिम तुटवडा होत असल्यास आणि जादा दराने खत विक्री होत असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले. सुभाषग्राम येथील शेतकऱ्यांनी या संदर्भात डॉ. होळी यांना निवेदनही दिले.

यावेळी सतीश रॉय, निरंजन बाच्छाड, विकास मैत्र, रेभा सरदार, सुमांकार मंडल, संतोष रॉय, विश्वजीत बार, क्रिष्णपद साना, हरी सरकार, आदित्य बिश्वास, निमय बाला, दिलीप सरकार, ईश्वर बिश्वास आदी शेतकरी उपस्थित होते. डॉ. देवराव होळी यांनी जनसंपर्क दौऱ्यात शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्याबद्दल शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button