
गोंदिया तालुक्याची आरोग्य विषयक आढावा सभा
गोंदिया : गोंदिया तालुकास्तरीय आरोग्य विषयक आढावा सभा १६ जुलै रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार होते. त्यांनी आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संस्थात्मक प्रसूती वाढवण्यासोबतच, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्या गावपातळीवरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.
या आढावा सभेत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, प्रगती आणि येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली, तसेच कार्यक्रमांमध्ये अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यात सुधारणा करण्याचे आणि लाभार्थ्यांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश दिले. ही बैठक आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
या बैठकीत एचएमआयएस पोर्टल डाटा एन्ट्री, संशयित पोलिओ रुग्ण शोध मोहीम, माता व बाल संगोपन कार्यक्रम, सर्पदंश उपचार व प्रतिबंध, सिकलसेल कार्यक्रम, कर्करोग तपासणी कार्यक्रम, असंक्रामक आजार नियंत्रण कार्यक्रम, नियमित लसीकरण, साथरोग नियंत्रण, ॲनिमिया मुक्त भारत अभियान, संस्थात्मक प्रसूती आणि कुपोषण, नवसंजीवनी योजना या प्रमुख विषयांचा आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी मार्गदर्शन केले. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा व मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले, तर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा डॉ. भाग्यश्री गावडे यांनी घेतला. हिवताप विभागाचा आढावा डॉ. विनोद चव्हाण यांनी सादर केला.
आढावा सभेप्रसंगी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, कुष्ठरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, तालुक्यातील नऊही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सलील पाटील यांच्यासह आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, उपकेंद्रांचे सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



